टँकर व्यावसायिकावर चाकूने वार
छत्रपती संभाजीनगर : नशेमध्ये धुंद असलेल्या एकाने टँकर व्यावसायिकावर चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गारखेडा गावात घडली. अब्रान शेख हसन (वय ३५, रा. गारखेडा गाव) असे चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहबाज नवाब शेख (वय २५, रा. गारखेडा गाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून, ते सपना बोअरवेलर या नावाने दुकान चालवतात. मंगळवारी (दि.३) सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास ते दुकानाजवळ उभे असताना त्यांच्या ओळखीचा इसम अन्नान शेख हा नशेत धुंद अवस्थेत तेथे येऊन जुन्या वादाच्या कारणावरून शहबाज यांच्याशी वाद घालू लागला. ‘माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, तरीही पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाहीत. तू कितीही ओरड, कोठेही जा’ असे म्हणत आरोपीने शहबाज यांना शिवीगाळ केली आणि कॉलर पकडून चापट मारली.
डाव्या हाताला पाच टाके, गुन्हा दाखल
त्यानंतर लाथ मारून, डाव्या हातावर धारदार चाकूने हल्ला करून जखमी केलं. हल्ल्यानंतर शहबाज यांनी आपल्या चुलत भावास फोन करून घटनेची माहिती दिली. हल्ल्यात शहबाज यांच्या डाव्या हाताच्या जखमेवर पाच टाके घालण्यात आले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्यातही एकावर चाकूने वार
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात भरत हा तरूण त्याच्या मित्रांसोबत चौकात गप्पा मारत थांबले होता. दरम्यान, भरत याचे आरोपी हृतिक याच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी भरत यांच्यावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बांबू आणि हातानेही मारहाण करून गंभीर जखमी केले.