File Photo : Crime
सिल्लोड : सोशल मीडियावर एका राजकीय नेत्याच्या विरोधात स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरुन गावात वाद झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या या तरुणाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच पकडल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात घडली.
हेदेखील वाचा : लहानग्याने टीव्ही सुरु करण्याचा प्रयत्न केला अन् तोच अंगाशी आला; शॉक लागून क्षणात झाला मृत्यू
सागर माधवराव पवार (वय २३, रा. शिंदेफळ) असे अंगावर डिझेल ओतणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सागर पवारने सोशल मीडियावर एका राजकीय नेत्याच्या विरोधात मोबाईल स्टेट्स ठेवले होते. यावर गावातील दुसऱ्या राजकीय गटाने आक्षेप घेतला. यातून वाद निर्माण झाला. यामुळे सागर पवार तक्रार देण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आला. पोलीस तक्रार घेत असताना तरुणाने अचानक अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच पकडले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारी देण्यात आल्या. त्यानंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोशल मीडियावरुन वाढले वाद
विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार गावागावात जाऊन कार्यक्रम घेत आहे. तर कार्यकर्ते याचा सोशल मीडियावरुन प्रचार करत आहेत. सोशल मीडियाच्या पोस्टवरील कमेंटवरुन एकमेकांचे राजकीय विरोधी असलेले कार्यकर्ते ‘सोशल वॉर’ होत आहे. सोशल मीडियावर कमेंटची पातळी घसरल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : ‘जशी करणी तशी भरणी सुरु’; लक्ष्मण हाकेंच्या कथित मद्यप्राशन व्हिडिओवर मनोज जरांगे पाटील यांची टिप्पणी