बारामती विमानातील फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाले (फोटो - सोशल मीडिया)
Baramati Accident : वरळी : बारामतीमध्ये काल (दि.28) भीषण विमान अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. या अपघातानंतर फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव त्यांच्या वरळीच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे.
मुंबईहून बारामतीकडे हे फ्लाईट गेले होते. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील मृत्यू झाला. महाराष्ट्रातील प्रभावशाली आणि मोठे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. फ्लाइट अटेंडंट अससेल्या पिंकी माळी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव वरळीमध्ये आणण्यात आले आहे.
हे देखील वाचा : ‘अलविदा दादा…’ अखेर घड्याळाचा काटा थांबला! अजित पवार अनंतात विलीन
फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या 29 वर्षीय होत्या. त्यांचे अवघे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पिंकी माळी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताच्या 24 तासानंतर पिंकी माळी यांच्या सासरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी पिंकी माळी यांचे पती सोमकर यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
पिंकी माळी या मागील सहा वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होत्या. त्यांनी अनेक विमानांमध्ये प्रवास केला असून अनेक व्हीआयपी लोकांसोबत प्रवास केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा आपले अनुभव कुटुंबीय आणि शेजारच्यांसोबत शेअर केला आहे. पिंकी माळी यांच्या पश्चात त्यांचे पती, वडील, आई आणि एक लहान भाऊ आहे. मागील वर्षभरापासून पिंकी माळी या व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होत्या. यापूर्वी त्या सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्टवर काम करत होत्या.
हे देखील वाचा : महाराष्ट्राचा विकास करणारा फायरब्रँड नेता गेला; अजित पवार यांच्या आठवणींनी हळहळला सातारा
अजित पवार अनंतात विलीन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा समुदायाने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमून अजित दादांना अलविदा केले. सर्वांच्या डोळ्यात पाणी बघायला मिळाले. यावेळी लाडक्या दादांना निरोप देण्याकरता लाखोंचा जनसमुदाय लोटला. तसेच अजित पवार यांना तोफांची सलामी देण्यात आली. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी तयार झाली असून सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी हे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.






