चोरीचे सोने खरेदी करणं सोनाराच्या अंगलट; तब्बल 9 तोळे सोने केले गेले जप्त
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनिक्स सोसायटी येथे घरफोडी करून तब्बल 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुख्यात चोरट्यास तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सोनारांना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. सोनारांच्या ताब्यातून पोलिसांनी 9 तोळे वजनाची सोन्याची लग्गड जप्त केली.
अनिल मिस्त्री राजधर (वय 38 वर्ष, रा. पो. बोदरी, ता. केरावत, जि. जैनपूर, उत्तरप्रदेश), असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुख्यात चोरट्याचे नाव आहे. तर रौनक योगेश सिंगवी (वय 28), ललीत बाबूलाल सिंगवी (वय 51, दोघे रा. साकीनाका, मुंबई), अशी चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनारांची नावे आहेत. चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या आकाश राजेंद्र देवूळगावकर यांच्या घरी 20 जून रोजी चोरट्यांनी चोरी करुन 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनिक्स सोसायटी येथे चोरी करणारा अनिल राजधर हा सोलापूरच्या कारागृहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली
गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलिस अंमलदार सुनील जाधव, नवनाथ खांडेकर, सोमनाथ भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके आदींच्या पथकाने सोलापूर कारागृहातून अनिल राजधर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आकाश देवूळगावकर यांच्या घरी चोरी केल्याची कबूली दिली. चोरी केलेले दागिने साकीनाका येथील रौनक सिंगवी व ललीत सिंघवी या सोनारांना विक्री केली.
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा यांसारखे प्रकार घडत आहेत. असे असताना गोंदियाच्या नवेगावबांध येथे चोरट्यांनी उच्छाद केला होता. गेल्या आठवडाभरापासून घरफोडी, मोबाईल दुकानात चोरी, पानटपरी फोडून चोरी अशा गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संभाजीनगर येथे फसवणुकीची घटना समोर आली.