अकोला: अकोल्यात जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा ठाकरे गटाचे नेता अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी केली आहे. राजेश मिश्रा यांनी ही घोषणा एका बलात्कार प्रकरणात केली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूच्या धाकावर बलात्कार केल्याचे समोर आले. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
नेमकं काय आहे प्रकरण?
6 सप्टेंबर (शनिवारी) रोजी दुपारी 4.30 वाजता गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. पीडित मुलीचे आई वडील हे विसर्जन बघायला गेले होते. आरोपीने याच संधीचा फायदा घेत आरोपी तौहिद बैद याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी घटनेच्या तीन दिवसांपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
खळबळजनक घोषणा
शिवसेना (ठाकरे गट) अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना राजेश मिश्रा यांनी एक खळबळजनक घोषणा केली. “जो कोणी या नराधम आरोपीचा एक हात, एक पाय आणि लिंग कापेल, त्याला शिवसेनेच्या वतीने 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शहरात आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण कायद्याच्या चौकटीबाहेरील हे विधान असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
अनेक सामाजिक संघटना आक्रमक
दरम्यान, बजरंग दल, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिद खान पठाण यांच्यासह अनेक सामाजिक संघटना या प्रकरणी आक्रमक झाल्या आहेत. तर, पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, ठाकरे गटाने दिलेल्या या वादग्रस्त इशारामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजात एकच खळबळ उडाली आहे.