वेबसाईटवरून वधू शोधणं पडलं महागात; महिलेने अविवाहित असल्याचं भासवलं अन् नंतर... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न केले. दुसऱ्या पतीच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन सेटलमेंटच्या नावाखाली 50 लाख रूपयांची मागणी केली. खोटा विवाह करून फसवणूक करणाऱ्या पत्नीचे नाव रंजिता पितांबर छाबरिया (वय 47, रा. श्री काकायाप्पा लेआऊट बंगळुरू) असे आहे.
रंजिता छाबरिया आणि तिचा मामा संजय मखिजा (वय 52, रा. शिवाजीनगर, सिकंदराबाद) यांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणात रवि वासुदेव वाधवाणी (वय ४९, रा. ऑगस्ट होमजवळ, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवि वाधवाणी हे खासगी नोकरी करताना लग्न लावून देणाऱ्या एका वेबसाईटवर त्यांची ओळख रंजिता पितांबर छाबरिया हिच्याशी झाली. तिने वेबसाईटवर दिलेल्या माहितीत ती अविवाहित असल्याचे सांगण्यात आले. तिच्यासोबत लग्नासाठी बोलणी सुरू झाली.
दरम्यान, दोघांनी ओळख वाढल्यानंतर दोघांच्या सहमतीने 7 जुन 2023 दोघांनीही मंदिरात लग्न केले. यावेळी रवि वाधवानी यांचा परिवार आणि रंजिता छाबरिया यांचाही परिवार उपस्थिती होता. लग्नात रवि वाधवानी यांनी रंजिता हिच्या अंगावर पंधरा लाखांचे दागिन्यांसह लग्नाचा खर्चही केला. लग्नानंतर रंजिता ही रविसोबत राहिली नाही. रवि हे बंगळुरूहून छत्रपती कामानिमित्त आले.
संभाजीनगर शहरात रंजिता ही बंगळुरूतच थांबली. दरम्यान, रंजिता ही संशयास्पद वागत असल्याने रवि वाधवानी यांनी बंगळुरू येथे रंजिताच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून माहिती घेतली असता रंजिताचा अगोदरच विवाह झाल्याची माहिती मिळाली. तसेच रंजिता हिच्या पीएफ खात्याची माहिती घेतली असता, तिचा वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान विवाहित असल्याची माहिती समोर आली.
परस्पर दिली खोटी तक्रार
लग्न झाल्यानंतर रंजिता ही तिच्या मामाकडे राहण्यासाठी काही दिवस गेली होती. यानंतर वारंवार रवि वाधवानी याने तिला सोबत घरी येण्याचे सांगितले. तिने वारंवार टाळाटाळ केली. रवि वाधवानी हे संभाजीनगरमध्ये असताना रंजिता हिने पोलिस ठाणे गाठून तिला नांदवत नाही. लग्न करून सोडून दिले अशी तक्रार दिली. याप्रकरणी रवि वाधवानी यांच्या तक्रारीवरून रंजिता पितांबर छाबरिया हिच्यासह संजय मखिजा या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.