संग्रहित फोटो
सासवड : मुंबईमध्ये विविध पत्रकार परिषदा आणि बैठकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पुरंदर विमानतळ प्रकल्प करणारच अशी ठाम भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये येवूनही मौन बाळगले आहे. ज्या गावात प्रकल्प करणार आहात त्या गावात आल्यानंतर त्याविषयी बोलणे अपेक्षित असताना मात्र पूर्णपणे मौन बाळगल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. खानवडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच्यासह जवळपास निम्मे मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदार उपस्थित होते.
पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे सासवड, जेजुरी या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांनी आमदार विजय शिवतारे व माजी आमदार संजय जगताप यांना प्रकल्पाबाबत एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. शिवतारे प्रकल्पाबाबत सुरुवातीपासूनच प्रचंड आग्रही आहेत. तर संजय जगताप यांनी काँग्रेसमध्ये असताना प्रकल्पाच्या जागेवरून कायम विरोध केला आहे.
दरम्यान संजय जगताप यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सासवड नगर परिषद निवडणुकीत विमानतळ महत्वाचे असल्याचे सांगितले. मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यावर फारसे वक्तव्य केले नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार असून, ९४ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली असल्याचे सांगितले. तसेच काही दिवसांतच मोबदला जाहीर करून प्रत्यक्ष भूसंपादन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
जिल्हा प्रशासनाने बंदिस्त मंडप उभारला
शनिवारी (दि. ११) महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक कॅबिनेट आणि राज्यमंत्री तसेच आमदार, खासदार उपस्थित होते. ज्या गावात कार्यक्रम होणार आहे त्याच गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प नियोजित असल्याने प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सभास्थळी पोहोचू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बंदिस्त मंडप उभारला होता. वेळप्रसंगी शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची पोलिसांकडून तयारी ठेवण्यात आली आहे.
सोशल मिडीयावर रंगली चर्चा
विमानतळ प्रकल्पाबाबत दररोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत असल्याने आणि मुख्यमंत्री याच गावात येणार असल्याने याबाबत काही तरी घोषणा करतील अशी अटकळ बांधली जात होती. याविषयाची ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी स्थानिक पत्रकारांसह पुणे, मुंबई तसेच राज्यातून प्रिंट, इलेक्ट्रोनिक, वेब पोर्टल, युट्यूब अशा सर्वच माध्यमातील पत्रकार आवर्जून उपस्थित होते. मात्र या सर्वांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. कार्यक्रम संपल्यानंतरही प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना गराडा घातला त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत चुकूनही शब्द येणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानतळ बाबत काहीच न बोलल्याने सोशल मिडीयासह सर्वत्र याचीच चर्चा रंगली होती.






