संग्रहित फोटो
पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाने मित्रांना ते पिस्तूल दाखविताना चुकून झालेल्या गोळीबारात त्याचा एक अल्पवयीन मित्र जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंढवा भागातील केशवनगर येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. गोळीबारात जखमी झालेला अल्पवयीन हा त्यांचा मित्र असून, तो हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील गुलमोहोर कॉलनीत राहायला आहे. चार दिवसांपुर्वी (दि. १८ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे व अल्पवयीन मुलगा मुंढव्यातील केशवनगर भागात गुरुकृपा सोसायटीच्या परिसरात मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. आरोपी पिस्तूल हाताळत होते. पिस्तूल उगारून ते एकमेकांना दाखवित होते. तेव्हा अल्पवयीन मुलगाही येथे थांबला होता. त्यानेही पिस्तूल हाताळले. नंतर मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीनाच्या दिशेने रोखले.
पिस्तूलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि अल्पवयीन मुलाच्या कंबरेत शिरली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…
बेकायदा पिस्तुलाचे प्रकार सुरुच
पिस्तूलांची निर्मिती ते त्याची पुरवठा साखळी पुणे पोलिसांनी गेल्या काही महिन्यात उघडकीस आणली होती. त्यानंतर मध्यप्रदेशात जाऊन संबंधित गावात छापेमारी केली होती. त्यांचे कारखाने उद्धवस्त केले होते. तर, काहींना अटक देखील केली होती. त्यानंतर शहरातील पिस्तूलांची आवक काही प्रमाणात कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र, त्यांनंतर देखील शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार सुरूच आहेत. हे पिस्तूल बाहेरून पुण्यात आणले जात आहेत. विशेष म्हणजे, दहशत माजविण्यासाठी हे पिस्तूल बाळगले जाते.






