संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोसरी येथील एका व्यक्तीचा खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. शरीराचे चार तुकडे अज्ञात ठिकाणी फेकले असून, केवळ धड मोशी येथील खाणीत फेकून दिले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी उघडकीस आली आहे.
सिद्धराम प्रभू ढाले (वय ४५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धराम हे २९ मार्च रोजी सकाळी घरातून कामासाठी गेले ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून येत नसल्याने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धराम ढाले यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. मात्र ते आढळून आले नाहीत.
२ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोशी येथील कानिफनाथ खडी मशीन समोरील खाणीमध्ये सिद्धराम यांचा मृतदेह आढळला. मात्र खाणी मध्ये त्यांचे केवळ धड होते. त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून, चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच डावा पाय, दोन्ही हात तोडले आहेत. हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत. दिघी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जमिनीच्या वादातून चुलत भावानेच संपवलं
वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवरून जुना वाद होता. हा वाद उफाळून आल्याने चुलत भावाने हत्याराने वार करत आपल्या भावाची हत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारातून समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण हा शेती आणि मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सुनील व त्याचा चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने वादातूनच ही घटना घडल्याचे समोर आले आहे.