संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभारत गुन्हेगारी वाढली असून, दररोज होणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आखाड पार्टीत पुर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्याप्रकरणी त्याच्यावर लोणी काळभोर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत भिसे जखमी झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, भिसे हा रिक्षाचालक आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्याला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ सहाच्या पोलिस उपायुक्तांनी दिले होते. शहरातून तडीपार केल्यानंतर भिसे हा नांदेड भागात राहत होता. (दि. ७ ऑगस्ट) त्याच्या आईने संपर्क साधला. तब्येत बरी नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा भिसे हा आईला भेटण्यासाठी लोणी काळभोर परिसरात आला. रविवारी (९ ऑगस्ट) भिसेच्या मामाने त्याला आखाड पार्टीचे निमंत्रण दिले. सकाळी तो लोणी काळभोर परिसरातील एका मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत गेला. तेथील एका शेडमध्ये आखाड पार्टीनिमित्त जेवण तयार करण्याचे काम सुरू होते.
भिसे मामाला जेवण तयार करण्यासाठी मदत करत होता. त्यावेळी चैाघे आरोपी तेथे आले. वैमनस्यातून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या डोक्यात दगड घातला. भिसे याला सोडविण्यासाठी आलेल्या बाळा भांड याला आरोपींनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भिसे याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. जखमी अवस्थेतील भिसे याने कोयता उगारुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिस हवालदार शिंदे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…






