संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारेगाव (ता. शिरुर) येथे एका तरुणाने प्रेमात अडथळा ठरत असल्याने चक्क तीन वर्षीय चिमुकल्याचा खून केल्याची घटना घडली होती. आता दारु पिताना एका तरुणाने दत्तात्रय सतीश निकम या तीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे मोहम्मद फैय्याज तरबेज याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
कारेगाव (ता. शिरुर) येथील मल्हार हिल्स सोसायटी शेजारील मोकळ्या जागेमध्ये दत्तात्रय निकम तरुणाचा मृतदेह असल्याचे नागरिकांना दिसले. दरम्यान, पोलिसांनी सदर तरुणाचा मृतदेह पंचनामा करत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. सदर घटनेत दत्तात्रय सतीश निकम (वय ३० वर्षे, सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. दुताळवाडी ता. पाटण जि. सातारा) या तरुणाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत हनुमंत सतीश निकम (वय ३०, वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. दुताळवाडी ता. पाटण जि. सातारा) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडखे, अविनाश थोरात, गुलाब येळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, दिपक दळवी यांच्यासह फॉरेन्सिक पथकाच्या प्रणोती पटले, मुस्तकीम सय्यद, प्रेम भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता दत्तात्रय याच्या सोबत एक तरुण असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोहम्मद तरबेज याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मोहम्मद तरबेज व दत्तात्रय निकम यांची नुकतीच ओळख झालेली असताना घरात उष्णतेचा त्रास होऊ लागल्याने दारू पिण्यासाठी सदर मोकळ्या जागेत गेल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून दत्तात्रय याचा डोक्यात मारहाण करुन व गळा आवळून खून केल्याचे कबुल केले. दरम्यान पोलिसांनी मोहम्मद फैय्याज तरबेज (वय २९ वर्षे, सध्या रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. आजादनगर मनगो जि. जमशेदपूर झारखंड) याला अटक करत न्यायालयात हजार केले. न्यायलयाने आरोपीला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके व अविनाश थोरात हे करत आहेत.






