मुंबई- कुर्ल्यात राहणाऱ्या एका महिलेनं (Women) आपआपसातील भांडणाचा बदला घेण्यासाठी तीन जणांविरोधात बलात्काराची (Rape) खोटी तक्रार पोलिसांत (Police) केली. या तिघांनी चाकूचा धाक दाखवत आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. सिगारेट पेटवून प्रायव्हेट पार्टमध्ये जखम केल्याचा आरोपही या महिलेनं या तिघांविरोधात केला. या महिलेच्या तक्रारीनंतर यातील एका आरोपीला अटकही करण्यात आली. त्याला जेलमध्येही डांबण्यात आलं. आता वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचं सत्य समोर आलं आहे.
[read_also content=”मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा; अटक वॉरंट रद्द… दंड किती ठोठावला माहितेय का? https://www.navarashtra.com/maharashtra/relief-to-mns-president-raj-thackeray-arrest-warrant-cancelled-do-you-know-how-much-fine-was-imposed-362636.html”]
तिघांसोबत ड्रग्ज विकण्याचं काम करत होती महिला
कुर्ला गँगरेप प्रकरणात ४२ वर्षीय महिलेनं केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालंय. या महिलेनं या तिघांविरोधात गँगरेप केल्याची आणि सिगारेटनं प्रायव्हेट पार्टमध्ये चटके दिल्याची तक्रार केली होती. या तीन संशयितांपैकी बबलू उर्फ याकूब सिद्दीकी याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला ४० दिवस जेलमध्येही राहावं लागलं. जो गुन्हा केलाच नाही, त्याची शिक्षा याकूबला विनाकारण भोगावी लागली.
महिलेचा खोटारडेपणा उघड
या महिलेनं केलेल्या आरोपांनंतर जेजे आणि भागा हॉस्पिटलमध्ये पीडित असल्याचं ढोंग करणाऱ्या या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यात तिनं केलेले आरोप हे ढळढळीत खोटं असल्याचं सिद्ध झालं. ती दावा करत असलेल्या जखमा तिने स्वत:लाच करुन घेतल्याचंही समोर आलं. बलात्काराचा बनाव या महिलेनं केला असल्याचंही स्पष्ट झालंय. घटना स्थळावरुन पोलिसांनी काही पुरावे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले होते, त्यातही आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत.
महिला आयोगानेही घेतली होती दखल
पोलिसांनी सांगितलं आहे की, आता याचा समरी रिपोर्ट तयार करुन तो कोर्टात सादर करण्यात येईल. त्यासोबत चौकशीची कागदपत्रेही जोडण्यात येतील. महिलेनं बदला घेण्यासाठी आरोप केल्याचं तिन्ही संशयितांनी आधीच पोलिसांना सांगितलं होतं. ड्रग्ज विकण्याच्या व्यवसायावरुन या चोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या खोट्या प्रकरणाची दखल महिला आयोगानेही घेतली होती. तसचं आरोपींना पकडण्याचे आदेशही देण्यात आले होते. आता हे आरोपच खोटे असल्याचं सिद्ध झालंय.