संग्रहित फोटो
सांगली : फोरेक्स ट्रेडिंगच्या दाखल गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना पलूस पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. महेश बाळासाहेब गायकवाड (वय ३६, रा. पलूस) असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा फोरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड याने तक्रारदार यांना दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी पलूस येथून ताब्यात घेतले होते. त्यांना अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडे १० लाखाची मागणी केली. त्याच दिवशी तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेतले व त्यांना अटकपूर्व जामीन करून घेण्याचा सल्ला देत सोडून दिले. त्यानंतर तक्रारदाराला उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला. त्यानंतर गायकवाड यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून उर्वरित ८ लाखांची मागणी केली.
दिनांक २५ मार्च रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून उर्वरित पैशाची व्यवस्था कर अन्यथा तुझी चारचाकी जप्त करेन, ट्रेडिंग अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीत तुझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करेन, अशी भीती तक्रारदार यांना घातली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. दिनांक २ एप्रिल रोजी पलूस पोलिस ठाणे परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यावेळी गायकवाड याच्या केबिनची पडताळणी केली असता त्याने तडजोडीअंती ३ लाखांची तक्रारदार यांच्याकडे मागणी करून ही रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.
पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, रामहरी वाघमोडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.