पालघर तालुक्यातील दांडी गावामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास ब्लॅंंकेट विक्रीसाठी रिक्षामधून दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्ती आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयजवळ उभ्या असलेल्या गावातील शालेय विद्यार्थीनींना या व्यक्ती आपल्या मोबाईलमधून लहान मुलींचे गुपचूप छायाचित्रण करीत असल्याचे मुलींना संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. गावातील नागरिकांनी ब्लॅंकेट विक्रीसाठी आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये लहान मुलींची छायाचित्रे सापडली.
मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेने संतप्त ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. या अनोळखी व्यक्ती लहान मुले पळविण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयाने स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला कळवली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उदय सुर्वे, तारापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निवास कणसे आणि मोठ्या संख्येने पोलीसांचा फौजफाटा दांडी गावात दाखल होऊन संशयित तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचवून संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. ब्लॅंकेट विक्रीसाठी रिक्षामधून आलेल्या संशयित व्यक्ती या गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.






