संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या कारणावरुन अनेक जण जिलन संपवत आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने या धक्क्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना पर्वती दर्शन परिसरात घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली होती.
मंदा गणेश दोडके (वय २५), साहिल गणेश दोडके (वय २५, रा. पर्वती दर्शन) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दोडके कुटुंबीय दांडेकर पूल येथे राहायला होते. तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन इमारतीचे काम सुरू झाल्याने दोडके कुटुंबीयांनी पर्वती दर्शन येथे भाडेतत्त्वावर खोली घेतली. मंदा दोडके या ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेचे काम करायच्या. दोडके यांना चार मुली आहेत. साहिल हा एकुलता एक होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाटी तो सकाळी दूध पिशवी वितरणाचे काम करायचा तसेच लिफ्ट दुरस्ती, देखभाल करणाऱ्या व्यावसायिकाकडे तो काम करत होता.
गुरुवारी (२५ जून) पहाटे मंदा यांना अर्धांगवायूचा झटका आला. साहिलने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांना त्या प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती खालवल्याने मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साहिल खचला. नंतर तो घरी गेला. शनिवारी (२७ जून) साहिलने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नातेवाईकांनी दरवाजा वाजविला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. साहिलच्या भाच्याने दरवाज्याच्या फटीतून पाहिले. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
साहिल एकुलता एक होता. चार मुलीनंतर साहिलचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो काम करुन मदत करत होता. साहिलचे आईवर खूप प्रेम होते. आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो खचला. ससून रुग्णालयातून तो घरी गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. शोकाकुल वातारवणात शनिवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभुमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले.






