संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना सतत घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंगणे खुर्द परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेल्या रेकॉर्डवरील आरोपीकडून सिंहगड रोड पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. सिध्देश सुरेश पवार (वय ३१, रा. विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक भुपेश साळुंके, पोलिस अंमलदार उत्तम तारु आणि आण्णा केकाण यांच्या पथकाने केली आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे तपास पथक ११ सप्टेंबर २०२६ रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, विश्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द येथे काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती अग्निशस्त्र घेऊन रस्त्याच्या कडेला थांबला आहे. मिळालेली माहिती तपास पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांना देण्यात आली. त्यानुसार साळुंके हे पोलिस पथकासह संबंधित ठिकाणी दाखल झाले. एक तरुण तेथे उभा असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो सुरुवातीला उडवाउडवीची आणि समाधानकारक उत्तरे देत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्याजवळ शस्त्र असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
पिस्तूलाची किंमत सुमारे ४० हजार रुपये, तर काडतुसाची किंमत सुमारे एक हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवार याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करीत आहेत. जप्त केलेले शस्त्र त्याच्याकडे कुठून आले आणि त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, याबाबत तपास सुरू आहे.






