संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या कारणावरुन अनेकजण टोकाचा निर्णय घेत आहेत. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये घडली आहे. मोनाली गोविंद पवार (वय २५ रा. सुतारदरा, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गोविंद पवार याच्याविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोनाली व गोंविद यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. मात्र, गोविंदचे एका दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्यामुळे पवार दाम्पत्य यामध्ये सातत्याने वाद होत होते. वादातून गोविंद मोनालीला शिवीगाळ करणे, मारहाण करीत जाच करीत होता. मोनालीने २२ ऑगस्टला राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे तपास करीत आहेत.
आठवीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
बकेश्वर तालुक्यातील काथवडपाडा येथील अवघ्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी शाळेच्या गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हरसूल व बोरीपाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. लावण्या लहुदास भोंडवे (वय १३, रा. काथवडपाडा, पो. देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या ही बोरीपाडा येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सध्या शाळेत चाचणी परीक्षा सुरू आहे. सामान्यतः आश्रमशाळेतील इतर विद्यार्थी तेथेच मुक्कामी राहून अभ्यास करतात; मात्र घर जवळ असल्याने लावण्या ही दररोज शाळेतून घरी ये-जा करत असे. गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतल्यानंतर लावण्याने काथवडपाडा येथील राहत्या घरी छताच्या वास्याला शाळेच्या ड्रेसच्या ओढणीने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ आरडाओरड करत तिला खाली उतरवले आणि उपचारासाठी हरसूल येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले.






