धक्कादायक ! पैशांसाठी कोयत्याने हल्ला; तब्बल 3.80 लाख नेले लुटून, आरोपींना अटक (संग्रहित फोटो)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोयत्याने (धारदार शस्त्र) हल्ला करून ३ लाख ८० हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही खळबळजनक घटना 2 डिसेंबर रोजी रात्री चिंचवड येथील केशवनगर परिसरात घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी रात्री ९:५० च्या सुमारास दीपक नरसाना यांच्या ‘श्रीजी सिरामिक’ दुकानाच्या परिसरात आशिष अरजनभा बुवा हे उभे होते. त्याच वेळी चार अज्ञात तरुण तिथे दुचाकीवरून आले. त्यांनी हातातील धारदार कोयत्याने बुवा यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. पळून जाण्यापूर्वी, आरोपींनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांना शस्त्रे दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : Mumbai Crime : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; लिफ्टमधील सीसीटीव्ही मध्ये घटना कैद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त एस. डी. आवाड आणि डीसीपी (गुन्हे) शिवाजी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी गुंडा विरोधी पथकाचे विशेष पथक तयार करून तपासाचे आदेश दिले.
पोलिस पथकाची कौतुकास्पद कामगिरी
गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने आणि पथकातील अधिकारी समीर लोंडे यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अखेर, थेरगाव गावठाण येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींमध्ये यश रमेश अंधारे (१८ वर्षे, रा. थेरगाव), रितेश मुकेश चव्हाण (१८ वर्षे, रा. जगताप नगर, थेरगाव), रुपेंद्र रुपबसंत बैद (१९ , रा. सुभाष नगर, पिंपरी) यांचा समावेश असून, एक विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यातील रितेश चव्हाण वर काळेवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे ही समोर आले आहे. चौकशीदरम्यान, या सर्व आरोपींनी गुन्ह्यात सामील असल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.






