कुरूंदवाड क्राइम न्यूज (फोटो- नवराष्ट्र)
कुरुंदवाड: कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड येथील गोलंदाज मळा येथे घरगुती सिलिंडर गॅसमधून बेकायदेशीर रित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचे साहित्य सापडल्याने संशयित आरोपी तोहीद परवेज गोलंदाज (रा. दत्त कॉलेज रोड, गोलंदाज मळा, कुरुंदवाड) यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस हेड कॉन्स्टेबल अबूबकर अब्दुलगणी शेख यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली. त्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील गोलंदाज मळा या ठिकाणी तोहीद गोलंदाज यांनी घरगुती सिलिंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता संशयित आरोपी गोलंदाज यांच्या घरासमोरील शेड जवळ उघड्यावर पंधरा हजार रुपये किमतीचे पाच सीलबंद गॅस सिलिंडर, २५०० रुपये किंमतीची अर्धवट भरलेली गॅस सिलिंडर टाकी, तीन हजार पाचशे रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर पाईप कॉक व इतर साहित्य, दोन हजार रुपये किमतीचा वजन काटा जप्त करण्यात आला.
तसेच पाचशे रुपये किमतीची पितळी नोझल, २५० रुपये किमतीची दोन पट्टी पाना असा एकूण २३ हजार ७५० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कवळेकर, सहाय्यक फौजदार एच. डी. सवतेकर, सहाय्यक फौजदार पी. एस. नरके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. जरळी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. डी. इंगवले ही कारवाई केली.
अग्निरोधक सामुग्रीचा अभाव
घरगुती वापराचे गॅस सिलिंडर धोकादायक पद्धतीने बाळगून स्फोटके माहित असतानाही सुरक्षेसाठी लागणारी अग्निरोधक सामुग्री जवळ न ठेवता व घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये ८० रुपये किलो प्रमाणे बेकायदेशीर गॅस भरला जात असल्याचे आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.