आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात झालेल्या गँगवॉरच्या घटनेने शहरात खळबळ उडवली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर याची हत्या केली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच त्याचा भाचा होता.
या प्रकरणाचा अंदाज आधीच पोलिसांना आला होता. आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करू शकते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्यांचा एक प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र, अखेरीस ५ सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला. या हत्येनंतर पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी तत्काळ आयुष कोमकर यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतःकडे घेतली.
आयुष कोमकरच्या हत्येनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पार पडत होते. त्यामुळे संपूर्ण पोलीस दल विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा उपलब्ध करणे शक्य नव्हते.
याशिवाय, आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय तुरुंगात असल्याने अंत्यसंस्कार लगेच होऊ शकले नाहीत. आयुषच्या हत्येनंतर त्याचे वडील जयंत कोमकर, काकी संजीवनी कोमकर आणि काका गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रक्रियेस वेळ लागणार असल्यामुळे पुणे पोलिसांनी आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता.
Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल
आज हा मृतदेह बाहेर काढण्यात येणार असून संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यसंस्कारासाठी आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मात्र संजीवनी कोमकर आणि जयंत कोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आंदेकर टोळीचे प्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर यांच्यासह एकूण 13 जणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. ते बंडू आंदेकर यांचे पुत्र होते.
दरम्यान, आयुष कोमकर (वय 18), महाविद्यालयीन शिक्षण घेत होता, याची 5 सप्टेंबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तो वर्गातून घरी परतत असताना घराच्या बेसमेंटजवळ दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील ठरले असून, आज आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.