बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड निघाला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ; अमेरिकेत आवळल्या मुसक्या
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर गेल्या महिन्यात भारत सरकारने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी केंद्रीय गृह विभाग किंवा एनआयए अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.
बाबा सिद्दीकी प्रकरणासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनमोल बिश्नोईला कॅलिफॉर्नियामध्ये ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनमोल बिश्नोई याच्यावर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या बांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. कित्येक दिवसांपासून तो फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणाने त्याच्यावर अनेक दोन गुन्हे नोंद केले आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयएने अनमोल बिश्नोईला अटक करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा केली होती. दरम्यान मुंबईतील या दोन्ही घटनांमध्ये मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई असल्याचं समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आणि एनआयए त्याच्या मागावर होते.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने नुकतेच अनमोल बिश्नोईबद्दल माहिती देणाऱ्याला ₹ 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने 2022 मध्ये दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोक्का न्यायालयात अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई यांना मुंबई पोलिसांनी वाँटेड घोषित केले आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांची आरोपी म्हणून नावे ठेवली आहेत. अनमोल बिश्नोईने सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर त्याच्याविरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आले होते.
क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही भाऊ आरोपी आहेत. १२ ऑक्टोबर रोजी जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन बंदुकधाऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा गँगस्टरही बिष्णोई टोळीच्या रडारवर असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. श्रद्धा वॉकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आफताब पूनावालाची तिहार तुरुंग प्रशासनाने अलीकडेच सुरक्षा वाढवली होती. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बिष्णोई टोळीने आफताब पूनावालाला लक्ष्य करण्याचा कट रचला होता.
अनमोल बिश्नोई उर्फ भानू हा गायक-राजकारणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्याप्रकरणातही आरोपी आहे. 2023 मध्ये त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बनावट पासपोर्टचा वापर करून त्याने भारतातून पलायन केलं होतं. तो नेहमी त्याचे ठिकाण बदलत तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. गेल्या वर्षी केनियामध्ये आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसला होता. त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत आणि जोधपूर तुरुंगात त्याची शिक्षा भोगली आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.