अमरावतीतील चिंधी बाजारात भीषण आग; 9 दुकाने आगीत जळून खाक, परिसरात एकच खळबळ (संग्रहित फोटो)
अमरावती : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठ्या दुर्घटना होत असल्याचे समोर आले आहे. त्यात आता शहरातील इतवारा बाजार परिसरातील चिंधी बाजारात भीषण आग लागली. ही घटना सोमवारी (दि. २२) पहाटे घडली. आगीत नऊ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमध्ये फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य, सागवान दरवाजे, चौकटी व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाला सोमवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास इतवारा बाजारात मोठी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन मुख्यालयाची टीम घटनास्थळी दाखल झाली. आगीचे रौद्ररुप लक्षात घेता प्रशांत नगर, ट्रान्सपोर्ट नगर आणि बडनेरा उपकेंद्रांमधून अतिरिक्त मदत मागवण्यात आली. एकूण नऊ अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये कादर फर्निचर, अमान फर्निचर, बाबुलाल फर्निचर, जमीलभाई, अजीज फर्निचर, मंटूभाई शीशेवाले, वकीलभाई इलेक्ट्रकवाले, सलमानभाई इलेक्ट्रकवाले व शेख रसूल यांच्या फर्निचर दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक
दरम्यान, या दुकानांमध्ये ठेवलेले फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य, सीएफएल लाईट्स तसेच जुने साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग विझविण्याच्या कामात अग्निशमन अधीक्षक व केंद्र प्रमुख अजय पंधरे, प्रेमानंद सोनकांबळे यांच्यासह मुख्यालयातील नितीन इंगळे, रोहित पानवलने, नीलेश देवकर यांच्यासह अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आजूबाजूची दुकाने सुदैवाने वाचली.
चिंधी बाजार दाट दुकानांचा परिसर
चिंधी बाजार हा दाट दुकाने असलेला परिसर आहे. दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग आणखी पसरू शकण्याची भीती होती. मात्र, अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीला वेळेत आळा घालण्यात आला आणि आजूबाजूच्या दुकाने सुरक्षित ठेवण्यात यश मिळाले.
नागरिकांची ताराबंळ
पहाटे आग लागल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सुरू आहे.






