'भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर...'; अंबादास दानवे यांचे मोठं विधान
छत्रपती संभाजीनगर : ‘भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घेत आहे. फक्त आमचेच नाही, तर शिंदे गटातील कार्यकर्तेही त्यांनी पक्षात घेतले आहेत. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणारे इतर पक्षांतील लोकांना का घेत आहेत? अनेकांना प्रलोभने देऊन पक्षात घेतले जात आहे. मात्र, नंतर ती पूर्ण होत नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राजू वैद्य हे ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत. त्यावर ते म्हणाले, राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते. आघाडीबाबतची चर्चा वैद्य यांच्या माध्यमातून सुरू होती. त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती आहे. वैद्य हे चांगले कार्यकर्ते आहेत. पक्षाने त्यांची दखल घेत त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यांनी हा निर्णय का घेतला, हे अद्याप समजलेले नाही. प्रत्येक पक्षात काही ना काही वाद असतोच. आता वैद्य ज्या पक्षात गेले आहेत, त्या पक्षातही वाद नाहीत का?”
हेदेखील वाचा : संभाजीनगरमध्ये युतीचा पेच वाढला! ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेवरून शिवसेना-भाजपात खलबते; जागावाटपाचा चेंडू आता मुंबईच्या कोर्टात
तसेच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ पूर्वी सांगितले होते की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. भाजप आजही याच मानसिकतेने काम करत आहे. रशीद मामू प्रकरणावर दानवे म्हणाले, आमचे सहकारी असतील, तर त्यांची नावे पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितली पाहिजेत. तुमच्या कार्यकर्त्यांचे धंदे तुम्हीच सांगितले. हे धंदे रोखण्यासाठीच काही लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
संजय शिरसाट यांना अधिक माहिती
संजय शिरसाट यांच्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, संजय शिरसाट यांना अधिक माहिती आहे. राजकारणात हट्ट आणि आग्रह असतोच. दोन्ही भाऊ सध्या चर्चा करत आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल.
कोकाटे, मुंडेंनी काय केलं ते जगजाहीर
माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही दानवे यांनी भाष्य केले. ‘कोकाटे आणि मुंडे यांनी काय केले, हे जगजाहीर आहे. न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. कोकाटे आणि मुंडे यांच्यावरील आरोप वेगळे आहेत. मुंडे सुटले, तर जनतेच्या मनात रोष निर्माण होईल’.






