Photo Credit- Social Media पुण्यात माजी महापौरांच्या बंगल्याबाहेर काळी जादू
पुणे: महाराष्ट्र हा जादूटोणा विरोधी कायदा करणारे पहिले राज्य म्हणून ओळखले जाते. पण आजही राज्यात छुप्या पद्धतीने असे जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याबाहेरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दत्ता धनकवडे यांच्या धनकवडी पुणे सोसायटीत गेल्या चार महिन्यांपासून अमावस्येच्या रात्री वेगवेगळ्या घरांसमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबू आणि काळा अभिर ठेवत असल्याचे दिसून येत होते. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात कुणीतरी जादूटोणा करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, एका अज्ञात महिलेनं माजी महापौरांच्या दारातही असेच साहित्य ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. परिसरात जादूटोणा होत असल्याच्या तक्रारी आधीच पोलिसांकडे आल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर, धनकवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये ही महिला मागील चार महिन्यांपासून केवळ अमावस्येच्या दिवशी विविध घरांसमोर नारळ, दही-भात, उकडलेली अंडी, लिंबू आणि काळा अभिर ठेवत असल्याचे आढळून आले.
Eiffel Tower Day 2024: काय आहे पॅरिसच्या गौरवशाली स्मारकाचा ऐतिहासिक प्रवास?
शनिवारी ( २९ मार्च) रात्री अमावस्येच्या दिवशी ८ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्रीच्या वेळी या महिलेने माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर हे साहित्य ठेवले. परिसरातील काही नागरिकांनी तिला प्रत्यक्षात रस्त्यावर हे सामान ठेवताना पाहिले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीसही तातडीने दाखल झाले आणि महिलेला ताब्यात घेतले.
सहकारनगर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवेक नामदेव पाटील (वय ६२) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी महिला मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ गृहसंस्था मर्यादित संकुलात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करत होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
CSK vs RR : चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य, राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयाच्या शोधात