बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप (फोटो सौजन्य: Pinterest)
पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात आढळून आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवकुमार बाबू वखरानी (वय १७ वर्षे ७ महिने, रा. ताडीवाला रस्ता, पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शिवकुमार २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घरातून बेपत्ता झाला होता. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवकुमारचा शोध सुरू केला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी (दि. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. चौकशीनंतर हा मृतदेह शिवकुमारचा असल्याचे निष्पन्न झाले.
चंदननगर पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. मात्र, शिवकुमारच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अपेक्षित पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवकुमारला नेमके कोणी आणि कोणत्या कारणातून पळवून नेले, त्यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला, याचा तपास करून संबंधित आरोपीला अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरू
“प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. नातेवाईकांच्या आरोपांची दखल घेऊन त्या दिशेनेही तपास केला जात आहे”.
– राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 5






