धक्कादायक! आणखी एखा अभिनेत्याचं अपहरण, बॉलिवूडमध्ये खळबळ
गेल्या आठवड्यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाय यांचे अपहरण झाले होते. मात्र त्यांच्या अपहरणामागे कोण होतं याचा अद्याप सुगावा लागला नसताना आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचं अपहरण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अभिनेते मुस्ताक खान यांचं अपहण झाल्याची तक्रार त्यांच्या मॅनेजरने बिजनौर पुलिस ठाण्यात नोंद केली आहे. मुस्ताक खान यांनी मेरठमधील राहुल सैनी नावाच्या व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभासाठी आमंत्रण दिलं होतं.
20 नोव्हेंबर रोजी अभिनेता मुश्ताक खान मुंबईहून विमानाने दिल्लीला पोहोचले. विमानतळावरून मेरठला येत असताना मुश्ताक खान यांचं मेरठ महामार्गावरून अपहरण झाल्याच म्हटलं आहे. अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली आणि अभिनेत्याला बिजनौरला नेऊन जबरदस्तीने पैसे वसूल केले. त्यांचे मॅनेजर शिवम यादव यांनी बिजनौरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवम यादवच्या तक्रारीवरून अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
बिजनौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक खान दिल्ली विमानतळावरून मेरठला रवाना झाले त्यावेळी त्यांच्या ड्रायव्हरसोबत आणखी एक व्यक्तीही कॅबमध्ये प्रवास करत होती. कॅब ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मुश्ताक खान यांना ही गाडी मेरठला घेऊन जाईल असे सांगून दुसऱ्या गाडीत बसवले. जुन्या गाडीचा चालक गाडी चालवत होता आणि महामार्गावर काही अंतर गेल्यावर त्याने वाटेत गाडी थांबवून अन्य दोघांना बसवले. मुश्ताक खानने आक्षेप घेतल्यावर त्यांना मारहाण करून त्यांचं अपहरण केलं.
यानंतर ते सर्वजण गाडी अज्ञात स्थळी घेऊन गेले. तिथे ते मुश्ताक खान यांना एका घरात घेऊन गेले. त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खान यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना टॉर्चर केलं आणि त्यांचा मुलगा मोहसीनच्या खात्यातून दोन लाख रुपये ट्रान्सफर केले.
याशिवाय पत्नीच्या खात्यातून एक लाख रुपये अपहरणकर्त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. रात्री अपहरणकर्ते त्याच्यासोबत खोलीत झोपले, तेव्हा ते कसे तरी तेथून बाहेर पडले आणि जीव वाचवण्यासाठी एका मशिदीत धाव घेतली. त्यांनी घडलेला प्रसंग मशिदीच्या मौलवींना सांगितला आणि त्यांची मदत मागितली. त्यावर मौलवींनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
मुश्ताक खानचे व्यवस्थापक शिवम यादव यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी राहुल सैनीसह पाच जणांविरुद्ध कोतवाली शहर बिजनौर पोलिस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिजनौरचे पोलीस अधीक्षक अभिषेक झा यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, हल्लेखोरांना लवकर अटक करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच प्रकरण उघड होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.