sasoon hospital (फोटो सौजन्य: social media)
पुणे शहरातील प्रतिष्ठित ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने 12 मे रोजी मोठी खळबळ उडाली होती. रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर आलेल्या या मेसेजनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा मेसेज रुग्णालयातीलच एका सुरक्षा रक्षकाने पाठवला होता!
बॉम्ब धमकीच्या मेसेजनंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) यांनी तात्काळ कारवाई करत ससून हॉस्पिटलची तपासणी केली. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ सापडला नाही. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
अटक केलेला आरोपी हॉस्पिटलमधीलच सुरक्षारक्षक
या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी येरवडा परिसरातून अरविंद कृष्णा कोकणी (वय 29) या तरुणाला अटक केली. चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली की, अरविंद हा ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नेमणुकीवर होता. त्याने रुग्णालयातील एका महिला पेशंटचा मोबाईल चोरून, त्यावरूनच ससूनमधील एका डॉक्टरला बॉम्ब धमकीचा मेसेज पाठवला होता.
मेसेज पाठवल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच मोबाईलवरून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक यांनाही पुन्हा धमकीचा मेसेज पाठवून मोबाईल पुन्हा बंद केला. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला अटक केली.
धमकी देण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही
आरोपीने ही धमकी का दिली, याचा तपास अद्याप सुरु आहे. त्यामागे कुठला खाजगी राग, मानसिक स्थिती, की काही इतर उद्देश होता, हे लवकरच उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे सार्वजनिक रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे.