बुलढाणा : काही दिवसांपूर्वीच गाय चोरीच्या खोच्या आरोपाखाली एका तरुणाला मारझोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. 28 जुलै रोजी म्हणजेच आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांना बुलढाणा शहरातील समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
23 जुलै 2025 च्या रात्री खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी रोहन पैठणकर (अनुसूचित जाती)हा तरुण खामगाव बस स्टॉप वर बसलेला असताना तीन गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला खामगाव येथे काँग्रेस भवन या ठिकाणी नेले. “तू कोणत्या जातीचा आहेस? असा प्रश्न विचारत त्या तरुणाला मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आली. इतकंच नाही तर “तुझा धर्म कोणता आहे?” बघण्यासाठी वस्त्र काढून नग्न करण्यात आले.त्यानंतर त्याला दुसऱ्या दुसऱ्या जागी नेऊन आणखी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली व गंभीर जखमी करण्यात आले. सदर प्रकार गाय चोरील्याचा काल्पनिक निमित्त करून या तिन्ही आरोपींनी तरुणावर जाणीवपूर्वक आरोप केले.
यातल्या तीनही आरोपींवर यापूर्वी खामगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यावरून हे तिन्ही आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत हे समजते. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पगारिया हा व्यक्ती दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यातील एक आरोपी गब्बू गुजरीवाल या आरोपीवर MPDA अंतर्गत पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे.
गाय चोरीच्या नावाखाली सुरू असलेला गुन्हा गर्दीचा हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा व अशा गुंडागर्दींना व माणसा माणसात तेढ निर्माण करणाऱ्या खतपाणी घालणाऱ्या कथित संघटनेवर सुद्धा बंदी घालण्यात यावी. हे प्रकरण मानव जातीला काळीमा फासणारे आहे. जातीय द्वेष निर्माण करून दोन गटांमध्ये जाणीवपूर्वक प्रकार घडवल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे. तरी वरील गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक न्यायालयातुन कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावरती सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, सम्राट संघटनेचे आशिष खरात चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी.आर. माळी, भारतीय बौद्ध महासभेचे एस एल डवरे ,अनंता मिसाळ, प्रल्हाद कांबळे, पॅंथर आकाश हीवाळे, मुकेश हिवाळे, रविकिरण मोरे किशोर सुरडकर संदीप इंगळे सचिन मिसाळ प्रेमदास काकडे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.