हरिद्वार : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमरदीप चौधरी यांची उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कानखल पोलिस स्टेशन अंतर्गत जगजीतपूर येथील राजा गार्डन परिसरात ही घटना घडली. मालमत्तेचा आणि पैशाचा व्यवहार हे खुनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
हरिद्वार शहराचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की, अमरदीप चौधरी यांना त्याचा मालमत्ता व्यवसायातील भागीदार राजकुमार मलिक याने हिशेब चुकते करण्यासाठी त्यांच्या घरी बोलावले होते. चौधरी त्याचा मित्र सोनू राठी सोबत मलिकच्या घरी पोहोचला जिथे दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला. त्यांनी सांगितले की, यादरम्यान तेथे उपस्थित असलेले राजकुमार यांचे दोन मुले मनदीप आणि हर्षदीप यांनी चौधरी यांच्या कंबर आणि कानावर नेम धरत गोळीबार केला.
आरोपींनी अमरदीप चौधरीचा साथीदार सोनूवरही गोळीबार केला, मात्र तो कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने चौधरीचा भाऊ बादल याला घटनेची माहिती दिली. बादल घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चौधरी यांना मृत घोषित केले.
व्यवसायाने वकील असलेले अमरदीप चौधरी यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र ते अनेकदा त्यांच्या कृतींमुळे वादात सापडले होते. हरिद्वार जिल्ह्यात त्याच्यावर प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्यांच्यावर गँगस्टर कायदाही लावला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.