बिर्हामणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पुणे : जिल्ह्यातील आदेश बिर्हामणे टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली आहे.
संदीप सोमनाथ शेंडकर (वय २७, धंदा- शेती रा. दापोडे ता.राजगड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर वेल्हा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७, (१),(३) सह १३५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, अमोल शेडगे, मंगेश भगत, तुषार भोईटे, वैभव सावंत व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुण्यासह ग्रामीण भागात देखील टोळ्यांचा उच्छाद अधून-मधून पाहिला मिळतो. पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल जिल्ह्यात कार्यरत असलेल्या टोळ्यांना जरब बसवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यादरम्यान, दोन दिवसांपूर्वी हवेली भागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त तसेच पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलिस अंमलदार अमोल शेडगे व मंगेश भगत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत संदीप शेंडकर याच्याबाबत माहिती दिली. त्यानुसार, पथकाने कोळवडी फाटा येथे सापळा रचून संदीप शेंडकर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुस मिळाले.
संदीप शेंडकर हा जिल्ह्यातील कुविख्यात आदेश बिर्हामणे टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ, कोंढवा तसेच सहकारनगर पोलिस ठाण्यात देखील खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर एकूण ७ गुन्हे असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.






