विधिसंघर्षित बालकांचे पालकही रडारवर, पोलिसांनी घेतली कठोर भूमिका (फोटो सौजन्य-X)
नाशिक :अल्पवयीन असल्याने पोलिसांची कारवाई नावापुरतेच होते, असे समजून भीड चेपली गेलेल्या विधीसंघर्षित बालकांकडून शहरातील विविध भागात होत असलेल्या गुन्ह्यांमधील सक्रीय सहभागा बरोबरच स्वतःची टोळी निर्माण करून धुडगूस घालण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी आता अशा बालगुन्हेगारांबरोबरच त्यांच्या पालकांनाही रडारवर घेतले आहे. 28 ऑक्टोबरच्या रात्री रस्त्यावर अशाच प्रकारे वाहनाची मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्या पालकांना थेट पोलीसात पाचारण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने पालकांनी माफीनामा लिहून देत यापुढे मुलाकडून कोणतेही कृत्य होणार नसल्याचे सांगितले व नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा म्हणून घोषणाही दिली.
पोलिसांनी समाजमाध्यमावर या संदर्भातील कीडीओ प्रसारित केला आहे. तिथे अल्पवयीन १४ ते १५ वयोगटातील एका चौकात वाहने अडवून दादागिरी करीत असल्याचे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा व्हीडीओ काढला. यातील एकाकडून दुचाकी जमिनीवर पाडून तिची मोडतोड करीत असल्याचे लक्षात आले. रस्त्यावर जोरजोरात आरडाओरड व गोंधळ घालणाऱ्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई केलीच परंतु त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात पाचारण केले व आपल्या पुत्रांनी घातलेल्या धुडगूसची माहिती देऊन अशा कृत्याबद्दल पालकांनाही शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून दिली.
सदर तिन्ही अल्पवयीन समाान्य कुटूंबातील असल्याने त्यांच्या लक्षात ही बाब आणल्यावर त्यांच्या पुत्रांच्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला व त्यांनी माफीनामा लिहून दिला. तसेच त्यांच्याकडून यापुढे असे कृत्य होणार नसल्याचे सांगून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे जाहीर केले आहे.
शहरात अनेक गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग चिंतेचा विषय झाला आहे. कायद्याने अज्ञान असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. शिवाय सुधारगृहात रवानगी केल्यावर सात ते आठ दिवसात पुन्हा बाहेर आल्यावर त्याच मागनि त्यांची वाटचाल सुरू राहते. त्यामुळे कायद्याने काही होत नसल्याचे समजून भीड चेपली गेल्याने त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होऊ लागला आहे. मोठ्या भाईकडूनही त्यांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याने गुन्हे करणे सोपे होऊ लागले आहे. त्यामुळे आता यापुढे बालगुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या पालकांवरही कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुमच्या अल्पवयीन मुलांना समज द्या. जर ते शहराची बदनामी करणाऱ्या कृतींमध्ये सहभागी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यांच्या पालकांनाही सहआरोपी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली.






