संग्रहित फोटो
पुणे : सायबर चोरट्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुण दोनशे रुपयांच्या लाभाला बळी पडल्यानंतर त्याला चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रास्ता पेठेतील एका वसतिगृहात राहणाऱ्या २६ वर्षीय डॉक्टर तरुणाने समर्थ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गेल्या दोन वर्षांपासून रास्ता पेठेतील एका वसतिगृहात राहतो. त्याने ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले असून, सध्या स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर पदवीचे (एमएस) शिक्षण घेत आहे. त्याला मोबाइलवर एका तरुणीच्या नावे मेसेज आला. त्यात घरबसल्या ‘हॉटेल रेटिंग’चा टास्क पूर्ण केल्यास कमिशन मिळेल असे सांगितले होते. त्यानुसार तरुणाला सुरुवातीला २३ लिंक पाठवून त्यावर रेटिंग देण्यास सांगितले. तरुणाने तो टास्क पूर्ण केल्यावर त्यास ‘यूपीआय’द्वारे दोनशे रुपये पाठवत त्याचा विश्वास संपादन केला.
नंतर सायबर चोरट्यांनी मात्र, तरुणाला आणखी सहा टास्क दिले आणि तरुणाला बँक खात्यातून १,०१३ रुपये पाठवायला सांगितले. ते पूर्ण केल्यानंतर त्यांनी एक लिंक पाठवून अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले.‘यू-कॉइन’ नावाचे अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याला ३० टक्के नफा झाल्याचे या अॅपवर दिसत होते. नंतर सायबर चोरटे तरुणाला प्रीपेड टास्क देत गेले आणि तरुण ते पूर्ण करीत होता. तरुणाने ‘यू-कॉइन’ अॅपमधून पैसे काढण्याची मागणी केली. तेव्हा ‘तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे. त्यामुळे पैसे काढता येणार नाहीत. तुम्हाला क्रेडिट स्कोअर वाढवावा लागेल. एका पॉइंटसाठी २३ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानुसार आवश्यक क्रेडिट स्कोअरसाठी चार लाख ६८ हजार रुपये भरा,’ असे सायबर चोरट्याने त्यांना सांगितले. मात्र, तरुणाने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला पैसे देण्यास उडावाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
‘करन्सी डिटेल्स चुकले’
दुसरीकडे ‘यू-कॉइन’ अॅपवर तरुणाचा नफा वाढत असल्याचे दिसून येत होते. त्या अॅपवरील पैसे काढण्यासाठी सायबर चोरट्यांनी तरुणाला टेलिग्रामवर करन्सीचे डिटेल्स भरण्यास सांगितले. तरुणाने त्यांना डिटेल्स दिले. मात्र, ते चुकल्याचे सांगून चोरट्यांनी तरुणाला २९ हजार रुपये भरण्यास सांगितले. तरुणाने ते भरले. त्यानंतर सायबर चोरट्यांच्या सांगण्यावरून तरुणाने ५० हजार, २० हजार आणि दोन लाख रुपये पाठवले. तरुणाने अशा प्रकारे एकूण तीन लाख १४ हजार ८८९ रुपये पाठवले.