डंपरच्या धडकेत मुस्ती येथील तीन मजुर ठार (संग्रहित फोटो)
सोलापूर : डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.24) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुस्ती-धोत्री रस्त्यावरील पाझर तलावाजवळील वळणावर झाला. या अपघातात एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर एकच शोककळा पसरली आहे.
देविदास मारुती दुपारगुडे (वय ३२), नितीन शाम वाघमारे (वय ३५), हनुमंता गोपीनाथ पवार (वय ४०, रा. तिघेही मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या तिघा मजुरांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मुस्ती येथील तिघे जण दुचाकीवरून धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) या गावाकडे मजुरीचे काम करण्यासाठी म्हणून जात होते. तर धोत्रीकडून मुस्ती गावाकडे माती भरण्यासाठी भरधाव वेगात डंपर जात होता. सदरचे वाहन हे मुस्ती पाझर तलाव क्रमांक एकजवळील वळणावर आले.
त्यानंतर डंपरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात तिघेही दुचाकीवरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. तिघांच्याही डोक्याला व सर्वांगास गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच डंपरच्या चालकाने डंपर न थांबवता तसाच निघून गेला. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने नुसती गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. शहरातील सिल्लोड रोडवरील मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कार भरधाव वेगात असल्याने आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.