नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
यवतमाळ : मीटर बसवण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 5 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि.30) राळेगाव येथील महावितरण कार्यालयात यवतमाळ लाच लुचपत विभागाने केली. यावेळी एकच खळबळ उडाली. जगदीश श्रीराम ढुमणे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहिणींना दिलेले पैसे आता परत मागण्यात अर्थ नाही…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
राळेगाव येथील वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून जगदीश श्रीराम ढुमणे हे कार्यरत आहे. वर्ग 2 अधिकारी म्हणून ते या ठिकाणी कार्यरत आहे. तक्रारदारांनी त्यांच्या घरी नव्याने मीटर लावण्यासाठी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून ते केस पेपर वीज वितरण कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला दिले. अनेक दिवसांपर्यंत त्या कागदपत्रावर पूर्तता करण्यात आली नाही. शेवटी तक्रारदाराने काय अडचण आहे, अशी विचारणा केली असता अभियंता दुमणे यांनी 5 हजार रुपये लाच मागितली होती.
तक्रारदार यांनी यासंदर्भात त्यांना होकार देऊन गुरुवारी (दि.30) तुम्हाला 5 हजार रुपये आणून देतो, असे सांगितले. याच यवतमाळच्या कालावधीत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंध खाते यांच्याकडे तक्रार नोंदविली. यवतमाळ कार्यालयाने या ठिकाणी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला 5 हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.
दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती मारूती जगताप, सचोंद्र शिंदे अपर पोलिस अधीक्षक, अमरावती, पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलिस अंमलदार पो.हवा. अतुल मते, अब्दुल क्सीम, पो.ना. सचिन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे व पोउपनि संजय कांबळे यांनी केली. राळेगाव शहरातील लाच लुचपत विभागाची एकाच महिन्यातील ही दुसरी कारवाई असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वनपालास लाच स्वीकारताना अटक
दुसऱ्या एका घटनेत, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच स्विकारणाऱ्या वनपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई शुक्रवारी, (दि.24) करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र कोहका येथे कार्यरत नरेंद्र सिताराम तोकलवार (वय 57) असे लाचखोर वनपालाचे नाव आहे.
हेदेखील वाचा : सीरियात होणार दहशतवादी राज्य तयार? बंडखोर नेता अल-जुलानी यांनी स्वत:ला केले राष्ट्रपती घोषित