एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात...
यवतमाळ : किफायतशीर प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. या बसमधून प्रवास करताना महिला, ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट आकारले जाते. बसमध्ये प्रवास करताना वाहक व प्रवाशांचे नेहमीच सुट्या पैशावरून वादावादी व्हायची. अशात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता प्रवाशी क्युआर कोड, फोन पे, गुगल पे यासारखा माध्यमांना पसंती देत आहे.
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून केवळ एकाच आठवड्यात जिल्ह्यातील ९ आगारातून ६० हजार ६४९ प्रवाशांनी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढले. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत असून, एखादी छोटी वस्तू खरेदी केली तरी नागरिक ऑनलाइनद्वारे पैसे देतात. डिजिटलमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली.
अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र, डिजिटल पेमेंटमुळे वाद होणार नाहीत. तसेच, सुट्ट्या पैशांची चिंताही प्रवाशांना राहणार नसून डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल, यासाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स एसटीच्या सेवेत आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोडचा वापर करून प्रवाशी तिकीट काढत आहेत. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
एक नोव्हेंबरपासून झाली सुरुवात
प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासून डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. या माध्यमातून एसटीच्या ९ आगारातून आठवड्याभरात ६० हजार ६४९ प्रवाशांनी २७ लाख ७१ हजार १५० रुपयांचे तिकीट काढले आहे.
प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये घट
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पर्स आणि रोख रक्कम चोरी जाण्याच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या होत्या. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होते. मात्र, सध्या यूपीआय ऑनलाईन पेमेंट प्रणालीच्या वाढत्या वापरामुळे प्रवाशांना आता रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज उरलेली नाही. मोबाईलमधूनच तिकीटासाठी पैसे देता येत असल्याने पॉकीटमारीसारख्या घटनांना आळा बसू शकतो. खास करून तरुण प्रवासी वर्ग आणि शहरी भागांमध्ये यूपीआय पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.