सेवेत असूनही दाखवण्यात आलं सेवानिवृत्त; कर्मचारी दोन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत (फोटो- सोशल मीडिया)
यवतमाळ : नोकरी करताना पगार हा सर्वांनाच हवा असतो. पण, यवतमाळमध्ये एक भलताच प्रकार घडला. एका कर्मचाऱ्याला पोलिस पगारपटावर चक्क सेवानिवृत्त दर्शविण्यात आले. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपासून ते वेतनाविना आहेत. एवढेच नव्हेतर आता मी सेवानिवृत्त नाही तर सद्यस्थितीत एका महत्वाच्या शाखेत कार्यरत असल्याचे त्यांना ओरडून सांगावे लागत आहे.
यवतमाळ जिल्हा पोलिस दलातून नियत वयोमानाची कारकीर्द पूर्ण करून वडील अवघ्या काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. ते सेवेत असतानाच त्यांचा मुलगा मोठे परिश्रम करून जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. सध्या तो ३० ते ३५ वयोगटातील असून एका महत्त्वाच्या शाखेत कार्यरत आहे. एवढेच नव्हेतर अनेक आव्हानात्मक गुन्ह्यात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. परिणामी, त्यांना वरिष्ठांनी अनेकदा रिवार्ड देत सन्मानितही केले आहे. असे असताना कौटुंबिक पार्श्वभूमी मूळचीच पोलिसातील असल्याने त्यांना सगळेच ओळखतात.
लिपिक यंत्रणाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत रेकॉर्डवर एखादी चूक होणे हेसुद्धा अपेक्षित नाही. मात्र, कुणालाही विश्वास बसणार नाही, अशी घोडचूक त्याच्याबाबत घडली आहे. त्या तरूणतुर्क पोलिस कर्मचाऱ्याला २ महिन्यांपूर्वी रेकॉर्डवर सेवानिवृत्त दर्शवले गेले. पहिल्या महिन्यात वेतन मिळाले नाही. त्यामुळे पगारपटात काही चूक झाली असेल, असे त्याला वाटले. मात्र, दुसऱ्याही महिन्यात त्याचे वेतन मिळाले नाही. तेव्हा चक्क त्याला सेवानिवृत्तच दर्शविण्यात आल्याचे पुढे आले.
दरम्यान, आता ही घोडचूक सुधारण्यासाठी लिपिकवर्गीय यंत्रणेला प्रयत्नांची अशी मोठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. एवढेच नव्हेतर कुठलाही दोष नसताना त्या कर्मचाऱ्याला मात्र मी सेवानिवृत्त नव्हेतर अद्यापही कार्यरत राहत असल्याचे सांगावे लागत आहे.
2 महिन्यांपासून गणतीत मात्र पगारात ‘गैरहजर’
सेवेत कार्यरत असताना चक्क रेकॉर्डवर सेवानिवृत्त दाखविलेला कर्मचारी हा गेल्या २ महिन्यांपासून नव्हेतर त्यापूर्वीपासूनही अपवाद वगळता कर्तव्यावर सातत्याने हजर आहे. गणतीत तो कर्तव्यावर हजर असल्याचे त्या महत्त्वाच्या सेवानिवृत्त दर्शविल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता प्रशासकीय स्तरावर याची माहिती घेतली जात असून, त्यापुढील कार्यवाही नंतर लवकरच केली जाईल, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे.