संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांत भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनकवडी परिसरात कौटुंबिक वाद-विवादातून पत्नीला मारहाण करून तिचे डोके भितींवर आदळत तिचा गळा दाबत खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती रोहित शंकर कदम (वय २७, रा. घोरपडी पेठ) याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितच्या २४ वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित व तक्रारदार पिडीतेचा काहीच वर्षांपुर्वी विवाह झाला आहे. ते घोरपडी पेठ परिसरात राहण्यास आहेत. तर, पिडीतीचे आई-वडिल धनकवडी भागात राहतात. कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वादविवाद होते. पिडीता आई-वडिलांकडे आलेली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी रोहित तिला नेण्यासाठी घरी आला होता. त्याने घरी चल असे सांगितले. पण, तिने येण्यास नकार दिला. तसेच, मी घटस्फोट घेणार असल्याचेही रोहित याला सुनावले. त्याचा राग रोहितला आला. त्याने पिडीतेला मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आदळले. तसेच, तिचा गळा दाबून तिच्या खूनाचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या
बीड शहरात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. यश देवेंद्र ढाका असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून धारदार शस्त्राने पोटात चाकू खुपसून यशची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे.