चांगलं पोहता येऊनही शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
यवतमाळ : शेतात जागलीसाठी गेलेला शेतकरी जेवण करण्यासाठी घरी परत येत असताना निर्गुडा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना वणी तालुक्यातील पुनवट गावाजवळील नदीपात्रात घडली. शेतीचे दिवस असल्याने ते रोज शेतात जागलीसाठी जायचे. नेमकं त्याचदरम्यान ही घटना घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
देवराव उकीनकर (वय ५५) असे नदीपात्राच्या बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे पुनवटजवळ असलेल्या नदीच्या दुसऱ्या तिरावर पुनवट-नवेगाव शिवारात शेत आहे. शेतीचे दिवस असल्याने ते रोज शेतात जागलीसाठी जायचे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे शेतात जागलीसाठी गेले होते. संध्याकाळ होताच ते परिसरातील आणखी २ शेतकऱ्यांसह जेवण करण्यासाठी शेतातून घरी परतत होते.
देवराव हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे ते सोबत असलेले सामान घेऊन नदीच्या दुसऱ्या तिरावर पोहोचणार होते. सामान ठेवल्यानंतर ते इतर दोघांना नदी पार करण्यासाठी मदत करणार होते. त्यात, गेल्या ४ दिवसांपासून वणी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने निगुर्डा नदीला पूर आला आहे. अशातच देवराव यांनी नदीत उडी मारताच नदीपात्राने त्यांना कवेत घेतले. देवराव बुडाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली.
दरम्यान, स्थानिकांना ही बाब शिरपूर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
गोसेखुर्द धरणाच्या कालव्यातही घटना
दुसऱ्या एका घटनेत, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असताना आता गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. सत्यपाल नीलकंठ सलामे (वय 26, रा. कोरंभी) असे या तरुणाचे नाव आहे. सत्यपाल सलामे याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.