Photo : iStock
हिंगोली : वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि.29) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी वसमत पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
हेदेखील वाचा : Kalyan Builder: कुख्यात बिल्डर सलमान डोलारेचा आणखी एक कारनामा समोर,अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
वसमत येथे पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणावरून सिध्देश्वर व येलदरी धरणाच्या पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय कार्यालयाअंतर्गत तलावांची दुरुस्ती व इतर व्यवस्थापनाचे कामही केले जाते. कार्यालयात इतर अधिकारी व कर्मचारी असा सुमारे ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे. बुधवारी सकाळी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार हे त्यांच्या शासकीय निवासस्थानातून कार्यालयामध्ये पायी जात असताना एका व्यक्तीने त्यांना थांबवून शिवीगाळ केली. मात्र, बिराजदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर संतापलेल्या व्यक्तीने बिराजदार यांना मारहाण केली. त्यानंतर तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिराजदार यांच्यासह वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली.
पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी तातडीने एक पोलिस पथक संबंधित व्यक्तीच्या शोधासाठी रवाना केले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. माहिती देण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचा प्रकार असावा, अशी शक्यता आहे.
मारहाणीचा निषेध
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे मागण्यांची निवेदन सादर केले. यामध्ये कार्यकारी अभियंता बिराजदार यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: सौरभ भोंडवेचा अपघात की घातपात? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक खूनप्रकरणे उजेडात