कुख्यात बिल्डर सलमान डोलारेचा आणखी एक कारनामा समोर
Kalyan unauthorised construction News In Marathi: कल्याणमधील कुख्यात बिल्डर सलमान डोलारे यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे. ९ मजली इमारत आणि एक भला मोठा बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे. इमारतीमधील सर्व सदनिका आणि वाणिज्य गाळे विकून टाकल्या आहेत. यूसूफ हाईटसनंतर कल्याणमधील जे.एम. टॉवर आणि जमजम व्हीला बंगला अनधिकृत घोषित झाल्याने रहिवासी हवालदील झाले आहे. आता या इमारतीवर लवकर कारवाईचा हातोडा चालविणार जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे (KDMC) उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे बिल्डर डोलारे याच्या विरोधात गुन्हे दाखल होऊनही त्याला पोलिस शोधू शकलेले नाहीत. तसेच बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणुक करणऱ्या बिल्डरांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बिल्डर डोलारे याने यूसूफ हाईटस ही इमारत उभी केली. या प्रकरणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याच बिल्डरने अन्सारी चौकात जे. एम. टॉवर या तळ अधिक ९ मजली इमारतीत वाढीव बांधकाम केले आहे. वाढीव बांधकामाची महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. याच टॉवर शेजारी १२ मीटर रुंद विकास योजनेच्या रस्त्यात बाधित असलेल्या जागेत जमजम व्हीला हा तळ अधित तीन मजली बंगल्याचे बांधकाम केले. या बंगल्याच्या वाढीव बांधकामचा बिल्डरने परवानगी घेतली नाही.
या प्रकरणी बिल्डरला महापालिकेने नोटिस बजावून सुनावणीकरीता बोलावले होते. वाढीव बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. जे. एम. पावर मधील वाढीव बांधकामाची परवानगी तसेच जमजम बंगल्याच्या अधिकृततेविषयी कोणती कागदपत्रे बिल्डरने सादर केली नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम महापालिकेने अनधिकृत असल्याचे घोषित केले. हे अनधिकृत बांधकाम बिल्डरने स्वत:हून पाडावे अशी नोटिस ही महापालिकेने बिल्डरला बजावली. या नोटिसलाही बिल्डरने काही एक प्रतिसाद दिलेला नाही नाही अखेरीस महापालिकेच्या क प्रभागाचे अधीक्षक उमेश यमगर यांनी बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले की, संबंधितल बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी अ’क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची मदत घेऊन इमारत पाडकामाची पुढील कारवाई केली जाईल.
बिल्डर डोलारे याच्या विरोधात यूसूफ हाईटसचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात डोलारे याला अटक करण्यात आलेली नाही. तो फरार आहे. यूसूफ हाईटस पाठोपाठ डोलारे याच्या विरोधात जे. एम. व्हीला आणि जमजम बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.