मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले उत्तर
अर्थसंकल्पावरील चर्चेत सुमारे ८४ सदस्यांचा सहभाग
मुंबई: राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत उत्तर देताना बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेत सुमारे ८४ सदस्यांनी सहभाग घेतला होता. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती, कर्जाचे प्रमाण, सिंचन, वीज, उद्योग, पायाभूत सुविधा, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले. तसेच अर्थसंकल्प सादर केलेल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणी असूनही आर्थिक शिस्त राखून विकास साधण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी सातत्याने आर्थिक शिस्त पाळली. त्यांच्याप्रमाणेच या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
LIVE | अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेस विधानसभेत उत्तर 🕝 दु. २.३१ वा. | ११-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 https://t.co/5FVB9rO8mn — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2026
“शासकीय कामकाजात AI चा वापर…”; ‘इंडिया ग्लोबल फोरम’मध्ये CM Devendra Fadnavis यांचे विधान
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय
राज्याची अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारत सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे. पुढील दोन-तीन वर्षांत संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरलाही महाराष्ट्र मागे टाकू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१३-१४ मध्ये राज्याचे सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) सुमारे १६ लाख कोटी रुपये होता. गेल्या दहा वर्षांत तो वाढून ५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. स्थिर किमतीवर राज्याचा विकासदर ७.९ टक्के तर चालू किमतीवर १०.४ टक्के आहे. दरडोई उत्पन्न ३,१७,८०० रुपयांवरून ३,४७,९०३ रुपयांपर्यंत वाढले आहे. देशाच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा वाटा ९.५ टक्के असला तरी देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १४.३ टक्के आहे. परकीय गुंतवणूक, तेलाव्यतिरिक्त निर्यात, स्टार्टअप्स, युनिकॉर्न, बँक ठेवी, बँक कर्ज वितरण आणि जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘फॉरेस्ट ऑफ इंडिया’ अहवालानुसार वृक्षआच्छादनातही राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले.






