बारामतीमध्ये भीषण अपघात
नीरा: बारामती रस्त्यावर बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक नजीक कठीण पूल येथील तुकाई नगर जवळ चार चाकी व ट्रक चा भीषण अपघात झाला असून यामध्ये कार चालक, महिला, बालके गंभीर जखमी झाले आहेत. वालचंदनगर परिसरातील एक कुटुंब आपल्या एक्स यू व्ही कार मधून मांढरदेवी या ठिकाणी काळूबाईच्या दर्शनासाठी बारामती बाजूकडून निरेकडे निघाले होते. तर नीरा बाजूकडून बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चा मालवाहतूक करणारा मालट्रक बारामतीच्या दिशेने निघाला होता. हॉटेल रेहान नजीक ट्रकने ( क्र.एम एच ४२ टी ९५४५ ) चुकीच्या बाजूला जात एक्स यू व्ही कारला ( क्र.एम एच १४ इ यू ७३५३ ) समोरासमोर जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती कळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी बारामतीला पाठवले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वडगाव निंबाळकरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात महिला व बालके गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.
श्रीनाथ ट्रान्सपोर्ट वर कारवाई करावी- नागरिकांची मागणी
बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट बद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. या ट्रान्सपोर्टच्या गाड्या नेहमीच भरधाव वेगाने असतात. शिवाय काही अपघात घडला की आर्थिक उलाढाल करून प्रकरण मिटवण्यात येते अशी चर्चा आहे. त्यामुळे मालक कितीही गब्बर असला तरी कोणताही हस्तक्षेप ना होता कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात
पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.12) घडली असून, शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ०१ डीजे ८३६५) निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने (पीबी ०६ ए यु ९९९५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल सिन्हा (वय २४) रस्त्यावर पडली, आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सावध राहण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अपघातानंतर पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनाक्रमामुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.