अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK Asia Cup 2025 Final : रविवारी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. पण मैदानावरील दमदार विजयायानंतर बऱ्याच घटना घडल्या, या विजयानंतर पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि एका पाकिस्तानी पत्रकार यांच्यातील जोरदार बाचाबाची चर्चेचा विषय बनली. या पत्रकार परिषदेत सूर्याने पाकिस्तानी पत्रकाराला त्याची जागा दाखवली.
हेही वाचा : Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला त्याच्या वर्तनाबद्दल आणि राजकीय भूमिकेबद्दल काही बोचरे प्रश्न विचारले, तेव्हा सूर्यकुमार यादवने त्याच्या विनोदी आणि संयमी उत्तराने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तर सोशल मीडियावर देखील आता व्हायरल होत आहे.
हस्तांदोलन आणि ट्रॉफी वादामुळे तणाव वाढल्याचे दिसून आले. गट फेरीच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंकडून पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार देण्यात आल्याने वादाला सुरुवात झाली. या घटनेने दोन्ही संघांमधील आधीच असलेल्या तणावाला आणखी बळकटी मिळाली. अंतिम सामन्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाकडून नकार देण्यात आला. भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला, ज्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले.
पत्रकार परिषदेदरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराकडून सूर्यकुमारला विचारण्यात आले, “तू एक हुशार खेळाडू आहेस, तू आज चॅम्पियन आहेस, पण संपूर्ण स्पर्धेत तुझे वर्तन चर्चेचा विषय ठरले आहे, तू हस्तांदोलन केले नाहीस, तू ट्रॉफीपासून देखील अंतर ठेवलेस आणि तू राजकीय विधाने देखील केलीस. क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू स्वतःला पहिला कर्णधार मानतोस का?” असा प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा : अॅशेस मालिकेपूर्वीच स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा! १४ वर्षांच्या कारकिर्दीला मिळाला विराम
उपस्थित असलेल्या माध्यम अधिकाऱ्यांकडून ताबडतोब हस्तक्षेप करण्यात आला आणि सूर्यकुमारला या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील केला गेला. पण सूर्यकुमार यादव हसला आणि म्हणाला, “मी उत्तर द्यावे की नाही? तू रागावलेला आहेस, आणि मला तुझा प्रश्न समजलेला नाही. तू एकाच वेळी चार प्रश्न विचारले आहेस.” या विनोदी उत्तराने पत्रकार कक्षात हशा पिकला आणि वातावरण हलके फुलके झाले.