'फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य'; धनंजय देशमुखांचा दावा
बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. पोलिस त्याच्या मागावर अजूनही आहेत. असे असताना आता कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनीच हा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पीडित देशमुख कुटुंबीयांनी कृष्णा आंधळेपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाची शनिवारी बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तीनवेळा गावात येऊन गेल्याचा दावा केला.
या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील ६ महिन्यांत ३ वेळा आमच्या गावी येऊन गेला. यामुळे आमच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही ही गोष्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या कानावर घातली आहे. त्यांनीही हा फरार आरोपी गावात येऊन गेल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली होती, ते पाहता या आरोपींविषयी देशमुख कुटुंबात मोठी दहशत आहे.
सुनावणीवेळी न्यायालयात वकिलांची खडाजंगी
संतोष देशमुख हत्याकांडाची शनिवारी बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने सरकारी पक्षाला बचाव पक्षाला योग्य त्या सर्व दस्तऐवजांची पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले. आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील, पुराव्यांची कमतरता व सरकारी वकिलांच्या नियुक्तीवर जोरदार खडाजंगी झाली. आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली. त्यांनी तसा अर्ज कोर्टात सादर केला.
संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर त्यांना अमानुष मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. आता हे सर्व आरोपी कोठडीत आहेत. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?






