संपूर्ण भारतात आता माओवाद्यांसाठी एकही ठिकाण सुरक्षित राहिलेलं नाही. अबुझमाडसारखा बालेकिल्ला सुद्धा गड म्हणून ढासळला आहे. आता वेळ आली आहे की, आपण शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत चर्चा करावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन सन्मानाचं जीवन जगावं असा थेट सल्ला आत्मसमर्पण केलेल्या माओवादी कमांडर नागसू तुमरेटी उर्फ गिरधर यांनी दिला आहे.
नागसू तुमरेटी, जो की माओवाद्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरील कमांडर म्हणून ओळखला जात होता, याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. जंगलात अजून ही लढण्यास उत्सुक असलेल्या उरलेल्या माओवाद्यांना तुमरेटीने हा सुचक सल्ला दिला आहे.
नंबाला केशवरावच्या मृत्यूनंतर गोंधळलेली चळवळ
नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याला सुरक्षा दलांनी अबुझमाड जंगलात ठार केल्यापासून माओवादी गटामध्ये मोठी घबराट पसरली आहे. चळवळीचा “कणा” मानला जाणारा केशव राव याच्या मृत्यूमुळे संपूर्ण संघटनेचा ढाचा कोलमडल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नागसू तुमरेटीने परिस्थितीचं भान ठेवत, माओवाद्यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
लढण्याची ताकद संपली, शस्त्रांचा कमतरता
आज माओवाद्यांकडे ना पुरेसं शस्त्र आहे, ना दारूगोळा. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत माओवादी फार काळ लढू शकत नाहीत. जेव्हा संपूर्ण कंपनी मिळूनसुद्धा बसव राजूला वाचवू शकली नाही, तेव्हा कोणीच सुरक्षित नाही हे लक्षात घ्यायला हवं असा स्पष्ट इशारा तुमरेटीने दिला आहे.
जनतेचा पाठींबा नाही, नव्या भरतीला प्रतिसाद नाही
तुमरेटीने हेही नमूद केलं की, नवीन तरुण आता माओवाद्यांमध्ये सहभागी होत नाहीत. स्थानिक जनतेचा पाठींबाही आम्हाला मिळत नाही. अशा परिस्थितीत जुन्या सहकाऱ्यांनी सत्य स्वीकारून योग्य निर्णय घ्यावा.
शांतता चर्चेसाठी शस्त्र खाली ठेवणं आवश्यक
1980 मध्ये माओवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सुरक्षा दल जनरल सेक्रेटरीपर्यंत पोहोचले असून त्याला मारले आहे. अशावेळी माओवाद्यांनी शांतता वार्तेचे प्रस्ताव देताना आणि किमान शस्त्र खाली ठेवले पाहिजे. हातात शस्त्र घेऊन चर्चा करण्यात कुठलाही अर्थ नाही, असं ही तुमरेटी म्हणाला. एका बाजूला शस्त्र संधीचा प्रस्ताव द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हातात शस्त्र घेऊन सुरक्षा दलांशी लढा ही द्यायचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीव जात आहे, रक्तरंजित वातावरण झाले आहे, त्यामुळे उरलेल्या नक्षल कमांडरसनी योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला ही त्याने दिला आहे.
महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला ठोेकल्या बेड्या; ‘या’ भागातून सापळा रचून पकडले