संग्रहित फोटो
पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. चोरटा मूळचा बिहारचा असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तरुण बलाराम झा (वय २६, रा. पठारे वस्ती, सुपेनगर, खराडी, मुळ रा. पाटणा, बिहार) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका ५० वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार, सहायक निरीक्षक सी. बी. बेरड व त्यांच्या पथकाने केली आहे.
तक्रारदार महिला १८ मे रोजी मुंढव्यातील केशवनगरमधील भागात नातेवाईकांच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून दुपारी तीनच्या सुमारास त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दरोडा आणि वाहन चोरी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड आणि पथक चोरट्याचा शोध घेत होते.
पोलीस कर्मचारी शशिकांत नाळे, विनायक साळवे यांना सराइत चोरटा तरुण झा याने दागिने हिसकावण्याचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. तो २३ मे रोजी हडपसर भागातील मगरपट्टा येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. आरोपी झा याच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात दागिने हिसकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ९० हजारांचे मंगळसूत्र आणि दुचाकी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.