POCSO ACT (फोटो सौजन्य- PINTEREST)
उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेने उल्हासनगर शहर सुन्न झाले होते, पण हिललाईन पोलिसांनी दाखवलेली जलदगती कारवाई उल्हासनगरवासियांसाठी दिलासादायक ठरली. घटना घडल्यावर आरोपीला तत्काळ अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी, आणि केवळ २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत पोलिसांनी न्यायप्रक्रियेला जबरदस्त वेग दिला आहे.
उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका अल्पवयीन मुलीचा २८ वर्षीय नराधमाने विनयभंग केला. ही घटना समजताच पोलिसांनी प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवून तत्काळ पावले उचलली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिललाईन पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वेगवान न्यायप्रक्रियेचे उत्तम उदाहरण
पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या पथकाने छापा टाकत आरोपीला काही तासांत तत्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पण विशेष म्हणजे, या एकाच दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून साक्षीपुरावे गोळा केले आणि अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही कारवाई ‘वेगवान न्यायप्रक्रिया’ कशी असावी, याचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले की ही घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती. आमच्या पोलीस टीमने पूर्ण जबाबदारीने आणि तत्परतेने काम केलं. आरोपीला अटक करताच तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला. सर्व साक्षीपुरावे गोळा करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. आमचे उद्दिष्ट एकच आहे की आरोपीला शक्य तितकी कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला त्वरित आणि संपूर्ण न्याय मिळावा. समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना स्थान नाही, याचा ठोस संदेश देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.