तस्करीचा संशय, पाठलाग आणि मग मृत्युच्या दाढेत, 12 वी च्या मुलाचा नाहक बळी आणि फिल्मी थरार!
दिल्ली- आगरा महामार्गावर तब्बल 10 किमी पाठलाग करत गोरक्षकांनी एका विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गो-तस्कर असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी बारावीमध्ये शिकत असलेल्या आर्यन मिश्राची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. दरम्यान काही दिवासांपूर्वी हरियाणामध्ये एक परप्रांतीय मजुराची गोमांस खाल्ल्याच्या संशयातून कथित गोरक्षकांनी हत्या केली होती.
फरिदाबादमधील बारावीचा विद्यार्थी आर्यन मिश्रा आपल्या मित्रांसोबत कारमधून जात असताना काही लोकांनी त्याला गाय तस्करी समजून त्याच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गोरक्षकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल कौशिक, वरुण, कृष्णा, आदेश आणि सौरभ या पाच आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांना माहिती मिळाली होती की डस्टर आणि फॉर्च्युनर कारमधील काही लोक गुरांची तस्करी करण्यासाठी शहरात फिरत आहेत.
हे सुद्धा वाचा: बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, 3 जण बेपत्ता
कथित गाय तस्करांचा शोध घेत असतानाच एक डस्टर कार येताना दिसली. त्या गाडीत आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र शँकी, हर्षित आणि दोन मुली होते. हर्षित गाडी चालवत होता आणि या लोकांनी त्याला गाडी थांबवायला सांगितल्यावर तो थांबला नाही. दरम्यान कारमध्ये बसलेल्या शँकीचे कोणाशी तरी भांडण झाले आणि त्यांना वाटले की त्याने त्याला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. गाडी थांबली नाही तेव्हा दिल्ली-आग्रा महामार्गावर सुमारे ३० किमीपर्यंत त्यांचा पाठलाग केला.
वाटेत कारजवळ आल्यावर त्यांनी गोळीबार केला आणि आर्यनच्या मानेजवळ गोळी लागली. आर्यन त्यावेळी पॅसेंजर सीटवर बसला होता. हे पाहून हर्षितने गाडी थांबवली मात्र आता आपल्यावर हल्ला होणार हे हल्लेखोरांना समजले त्यामुळे त्यांनी पुन्हा गोळीबार केला. यामध्ये दुसरी गोळी आर्यनच्या छातीत लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी कारमध्ये दोन मुलीही असल्याचे पाहिल्यानंतर त्यांना त्यांची चूक समजली की हे लोक गाय तस्करीचे नव्हते ज्यांना ते शोधत होते आणि ते चुकून दुसऱ्या गाडीचा पाठलाग करून येथे पोहोचले होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी तेथून पळ काढला.
उल्लेखनीय आहे की, 27 ऑगस्ट रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे पश्चिम बंगालमधील मुस्लिम स्थलांतरित साबीर मलिक याला गोरक्षकांनी मारहाण करून ठार मारले होते. त्यांनी ‘बीफ’ खाल्ल्याच्या संशयावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जण जखमीही झाला आहे.