केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच...
नागपूर : केंद्रीय मंत्रालयात वैयक्तिक सचिव आणि सहाय्यक असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या ठकबाजांच्या टोळीने सरकारी नोकरी, गॅस एजन्सी आणि गोदाम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यात ५ जणांची १.९४ कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्यात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी नामदेव विश्वनाथ कडू (वय ६४, रा. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
रामचंद्र पाटील, देवेंद्र भार्गव, शिवम सेन आणि योगेश मिश्रा हे व्यावसायिक आहे. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांची रामचंद्र पाटीलशी ओळख झाली. पाटीलने तो केंद्रीय मंत्र्यांच्या पीएचा सहाय्यक असल्याची बतावणी केली होती. त्याने नामदेवची ओळख देवेंद्र भार्गवशी करून दिली की, तो केंद्रीय मंत्रालयात मंत्र्यांचा सचिव आहे. भार्गवने त्यांना सांगितले, त्यांचे रेल्वे, आयकर, पुरातत्व, नीती आयोग, एफसीआय आणि केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर विभागांमध्ये चांगले संपर्क आहेत. तो या विभागांमध्ये कोणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो. एखाद्याला गॅस एजन्सी, पेट्रोल पंप किंवा सरकारी गोदाम हवे असेल तर ते सुद्धा मिळवून देऊ शकतो. परंतु, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.
हेदेखील वाचा : दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…
नामदेव आरोपींच्या दाव्यांना बळी पडले. त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला नोकरी मिळवून देण्यासाठी आरोपींना ७५ लाख रुपये दिले. नामदेव यांनी नातेवाईकांनाही याबद्दल माहिती दिली. चार नातेवाईकांनीही नोकरी आणि मोठे कंत्राट मिळविण्यासाठी आरोपींना पैसे दिले. एकूण १.९४ कोटी रुपये घेतल्यानंतर आरोपींनी बनावट नियुक्तिपत्रे, कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे दिली.
कागदपत्रांवर सरकारी कार्यालयांचाही शिक्का
कागदपत्रांवर सरकारी कार्यालयांचा शिक्काही होता. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर फसवणूक उघडकीस आली. आरोपी पैसे परत करण्यास नकार देऊ लागले. त्रस्त होऊन नामदेव यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेदेखील वाचा : West Bengal Crime: तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचा खून! मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले; कारण काय?






