पत्नीसमोरच पतीची हत्या; चाकूने पोटावर केले सपासप वार अन्... (फोटो - iStock)
अमरावती : अमरावतीच्या वाटपुरात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. सुनील ज्ञानदेवराव ऊर्फ जयराम बनसोड (रा. वाटपूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि.12) आरोपी पंकज कडू (वय 30, रा. वाटपूर) याला अटक केली आहे.
लोणी पोलिस ठाण्यात शनिवारी सुलोचना सुनील बनसोड (वय 39, रा. वाटपूर, ता. नांदगांव खंडेश्वर, जि. अमरावती) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचे पती सुनील बनसोड हे घराच्या बाहेर बसून होते. त्यावेळी त्यांना आरडाओरड ऐकू आली. त्यामुळे सुलोचना यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता, पती सुनीलचा घरासमोरच राहणाऱ्या पंकज कडूसोबत वाद सुरु होता.
दरम्यान, सुलोचना यांच्या पतीने आरोपी पंकज कडूला हटकले असता, त्याने घरातून चाकू आणून सुनीलच्या पोटावर वार केला. सुलोचना यांनी आरडाओरड केली असता, पंकज कडू हा तेथून पळून गेला. त्यानंतर गावातील लोकांनी जखमी सुनील बनसोड यांना लोणी येथील दवाखान्यात नेले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. त्यानंतर सुलोचना यांनी त्यांचा भाचा अंकुश जामनीक यांना फोन करून विचारले असता, सुनील यांचा मृत्यू झाल्याचे कळले.
या तक्रारीवरुन लोणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी फरार आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीवरून आरोपी पंकज कडू याला अमरावती येथील गांधी चौकातून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
वाटपूर येथील घटना; आरोपीला अटक
मृत सुनील हा वाटपूर गावात अवैधरित्या दारू विक्री करत होता. तर आरोपी पंकज कडू हा सुनील बनसोड यांच्या घरासमोरच राहत होता. दरम्यान, अवैध दारुच्या व्यवसायावरून हा वाद झाल्याची चर्चा वाटपूर गावात सुरु आहे. यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.